शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

उल्हासनगर : पर्यावरणाला हानिकारक ठरत असलेल्या व प्रदूषणात आणखी भर घालणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांवर शहरात कोणतेही निर्बध नसल्यामुळे पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर ठिकठिकाणी बंदी असतांना शहरात मात्र सर्वत्र पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. प्लास्टिक पिशव्या कुजत नसल्याने व त्या जाळल्याने वातावरणात विषारी वायू निर्माण होऊन अपायकारक ठरत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पूर येण्यासारख्या बहुतांश घटना या पिशव्यांमुळेच घडत असतात. त्यांच्या वापरांवर कोणतेही निबंध नसल्याने त्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पिशव्यांवर बंदी आणून त्यांच्या वापरावर निबंध घालावेत अशी मागणी (उल्हासनगर युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश अहिरे यांनी केली आहे.