मुंबईतील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत बंद

मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. दिवसभरात लोकलच्या किमान ३ हजार फेऱ्या होतात. अर्थात लोकल हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी लोकल बंद करणे हे शेवटचे पाऊल होते. त्याबाबत गेले काही दिवस चाचपणीही सुरू होती. कालच कोकण विभागीय आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णयही जाहीर केला होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी-अधिकारी तसेच तातडीचे उपचार आवश्यक असणारी व्यक्ती सोडून कोणालाही रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, असे शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले होते. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या निर्णयानंतर आता मुंबईतील लोकलसेवाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लोकलला खऱ्या अर्थाने ब्रेक लागणार आहे.