राजस्थान, पंजाबमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित

करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राजस्थानंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी करोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आवाहन जनतेला केले आहे.

या पूर्वी पंजाब सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. यांमध्ये जालंधर, संगरूर असे जिल्ह्यांचा समावेश होता. परंतु, करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात दररोजच्या गरजेच्या वस्तू लोकांना मिळाव्यात यासाठी भाजीपाला, दूध, मेडिकल स्टोअर आणि रेशन दुकाने सुरू राहणार आहेत. यां व्यतिरिक्त कोणतेही दुकान सुरू राहणार नाही.

राजस्थानातही लॉकडाऊन

राजस्थानातील गेहलोत सरकारने या पूर्वी करोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, मॉल, काराखाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतात. तर, भाजीपाला, दूध आणि दररोज लागण्याच्या आवश्यक गोष्टींची दुकाने, तसेच मेडिकल स्टोअर उघडी राहतात.